बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकर यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम; कारण काय?
मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बच्चू कडूंनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले की, या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते भारतरत्न आहेत आणि भारताचे अभिमान आहेत.
तसेच आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपान देण्याचं आंदोलन करणार आहोत. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाईन गेमच हद्दपार करा. आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यामुळेच आमचा त्यांनी जाहिरात करण्यावर विरोध आहे. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. सचिन यांनी जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत देऊ आणि त्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत. भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू असे बच्चू कडू म्हणाले.