औरंगाबादेत जाऊन शहाजीबापू पाटलांचे खैरेंना आव्हान; म्हणाले, आयुष्यात खासदारकी कधीच नाही
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री शिंदेंची आज रोहया मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा पार पडली. या सभेला शिंदे गटाच्या मंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. या सभेत मुख्यमंत्र्यांसोबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुद्धा जोरदार फडकेबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरेंवर जोरदार निशाणा साधत आव्हान दिले आहे.
नेमकं काय म्हणाले पाटील?
औरंगाबादच्या सभेत बोलत असताना पाटील म्हणाले की, येथे सर्व मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्री आले आहेत. संदीपान भुमरे यांनी तुम्ही एवढा मोठा स्टेज बाधला पण एकच चुकच केली दोन खुर्च्या कोपऱ्यात ठेवायला पाहिजे होत्या. एक त्या चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठी. तेव्हा त्यांना कळले असते. की जनसागर काय आहे. तुमच्या आयुष्यात खासदारकी कधीच नाही, अशी विखारी टीका शहाजीबापू पाटील यांनी खैरे यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक करताना शहाजीबापू पाटील भावूक
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील यांनी तोंड भरून मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले, यावेळी ते भावुक झालेले दिसून आले. ते म्हणाले की, मला ठाण्यात फोन आला. आरोग्य शिबिराचे उदघाटन करायचे आहे. शिबिर कसले तर, चिमुकल्यांच्या हदयांना होल असते ते बुजवण्याची शस्त्रक्रिया या शिबिरातून होणार आहे. याचे उदघाटन करायचे आहे. एवढा मोठा मुख्यमंत्री आपल्या आई-बहिणींची काळजी करतो. हे खूप मोठे आहे. शिंदे यांच्या पाठिमागे जनता ठामपणे उभे आहे, असे बोलत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले आहे.