आमदार शिरसाटांना लगावला जलीलांनी खोचक टोला; म्हणाले, भुमरेंना खुर्चीवर पाहून रक्तदाब...
एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना काल रात्री ह्रदयविकाराचा झटका आला. शिरसाटांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेक राजकीय मंडळींकडून यावर प्रतिक्रिया येत आहे. यावरूनच आता औरंगाबाद एमआयएम खासदार इम्तियाज जलील एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार शिरसाटांना चिमटा घेतला आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील शिरसाटांवर बोलताना म्हणाले की, काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिरसाट माझ्यासोबतच बसले होते. आमच्यात बऱ्याच गप्पागोष्टी सुद्धा झाल्या. तर जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली होती, त्यावेळी संजय शिरसाट आक्रमकपणे भूमिका मांडत होते.
त्यामुळे शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार याबाबत सर्वांना अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळात वगळण्यात आले. त्यामुळे जेव्हा भुमरे यांना शिरसाट यांनी पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहिले, त्यावेळी या खुर्चीवर मी बसणार होतो असे त्यांना वाटले असावे. आपण ज्या खुर्चीवर बसणार होतो. आता भुमरे बसले असल्याने त्यांचा रक्तदाब वाढला असावा असा खोचक टोला यावेळी बोलताना लगावला आहे.