शिवसेनेनंतर पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न; रोहित पवारांचे मोठे विधान
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्याचप्रमाणे पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना हे रोहित पवारांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मुलाखतीत तुमच्या आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा असल्याची अनेकदा चर्चा झाली. तर, तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांनीच मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. मला आमदारकीसाठीही त्यांनीच उमेदवारी दिली होती. एवढचं काय तर माझं लग्नही त्यांनीच ठरवले होते. आपण वाढतो तेव्हा आपली स्पर्धा ही अंतर्गत नसते. कुटुंबात लढण्यात आम्ही आमची शक्ती घालवत नाही. आमचे टार्गेट वेगवेगळे आहेत. सुप्रिया सुळे या खासदार आहेत. तर, अजित पवार हे राज्यात लक्ष घालतात. सध्या मी जिथे आहे, त्यावर अधिक लक्ष देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
आमच्या घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असं विरोधकांना वाटतं. शिवसेनेनंतर विरोधकांचं पुढचं टार्गेट आम्ही असू शकतो, असे भाकीत त्यांनी वर्तविले.
राष्ट्रवादीमुळे बंड करावं लागल्याचा आरोप बंडखोरांनी केला, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोणावर तरी आरोप करायचे म्हणून शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आणि खासदारांनी राष्ट्रवादीवर खापर फोडलं. तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार करू शकता. पण दुसऱ्या पक्षात किंवा संघटनेत तुम्ही हस्तक्षेप करू शकता नाही. त्यांच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाईसह इतर अनेक कारणं या बंडामागे आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात. काही दिवसांपुर्वीच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होते. या अधिवेशनात जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना अजित पवार दोनदा उठून सभागृहाबाहेर गेले. यामुळे नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. तर, सत्ताधाऱ्यांकडूनही जयंत पाटलांना विरोधी पक्षनेते पदावरुन चिमटे काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर रोहीत पवार यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.