साहेबांचे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणार; विजयानंतर अश्विनी जगतापांची प्रतिक्रिया
सुशांत डुंबरे | पिंपरी-चिंचवड : कसब्यानंतर चिंचवड मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला. यानंतर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय जगताप आणि जनतेला समर्पित, असे त्यांनी म्हंटले आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांचा त्यांनी पराभव केला आहे. हा आनंद क्षण नाही. दुखांचे सावट आहे. विजयाचा जल्लोष करायचाचा विषय नाही, असे अश्विनी जगताप यांनी म्हंटले आहे.
तर, हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि जनतेला समर्पित आहे. या विजयाचे श्रेय भाजप, मित्र पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देते. जगताप साहेबांची अपूर्ण कार्य पूर्ण करणार असून त्यांचे नाते जिव्हाळ्याचे नाते समृध्दीचे हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा 1 लाख 35 हजार 434 मतांनी विजय झाला आहे. तर, नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली आहेत. तर, बंडखोर आमदार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली आहेत.