पेडणेकरांच्या टीकेवर शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, अंगात नाही बळ...
राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडत आहे. अशातच अंधेरी पोटनिवडणुकीवरून रान पेटले आहे. आता भाजपने माघार घेतली तरी आद्यपही भाजप आणि ठाकरे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे.कुणाच्या कळा, कुणाचं बाळंतपण आणि कुणाच्या मांडीवर बाळ हे सर्वांना कळते असे म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केली होती. आता पेडणेकरांच्या या टीकेवर आता भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले शेलार?
अंगात नाही बळ आणि कळ काढून पळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हे धंदे बंद करावेत अंधेरी पोट निवडणूक मधून उमेदवार माघे घेऊन भाजापने महाराष्ट्रची उच्च राजकीय परंपरा जपण्याच्या काम केले आहे असे म्हणत त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या होत्या पेडणेकर?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने उमेदवार मागे घ्यावे असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. यानंतर भाजपने उमेदवार मागे घेतल्याची चर्चा आहे. या पत्रावरुन किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला. कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सगळ्यांना कळतं आहे. भाजप आणि ईडी सरकारला मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आणि भोंगे लागतात. पत्रं लिहिणाऱ्यांना एक विनंती आहे. आपल्या हातून फॉस्कॉन जाऊन पॉपकॉर्न आला आहे, त्याबद्दलही एक पत्रं लिहावं असा टोमणा पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लगावला होता.