...मग घ्या ना धौती योग! आशिष शेलारांचे शिवसेनेला प्रत्युत्तर
मुंबई : राज्यभरात सध्या नवरात्रीची धूम आहे. यानिमित्ताने अनेक राजकीय पक्षांकडून रास-दांडीयांचे आयोजन केले जात आहे. भाजपनेही मराठी दांडीयांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावरुनच शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावरील एक पत्रच आशिष शेलार यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली..ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग, अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे.
भाजपा दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे "करुन दाखवले" असे होर्डिंग लावले नाहीत, असा टोलाही शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.
पण, जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता "थापा" पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली. गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, असाही निशाणा त्यांनी शिवसेनेवर साधला आहे. अहंकार, गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना, असेही शेलारांनी शेवटी म्हंटले आहे.
दरम्यान, शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हंटले होते की, गेल्या 50 वर्षांत कमळाबाईने हे असले ‘दांडिये’ प्रयोग भरपूर केले, पण त्यांना यश आले नाही. पवित्र उत्सवातही राजकारणाच्या फोडाफोडीचे विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रावर दुहीची आफत आणत आहेत. दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचाच आहे व त्यासाठी त्यांचे हे नवे नवे उद्योग सुरू झाले आहेत, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.