आमचे गृहमंत्री 'फडतूस' नाही 'काडतूस' आहेत; शेलारांचे उध्दव ठाकरेंना उत्तर
मुंबई : रोशनी शिंदे प्रकरणी उध्दव ठाकरेंनी एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही यावरुन उध्दव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. आमचे गृहमंत्री 'फडतूस' नाही 'काडतूस' आहेत, असे प्रत्युत्तर आशिष शेलारांनी दिले आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
आमचे गृहमंत्री 'फडतूस' नाही 'काडतूस' आहेत! मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला. कोणत्याही मारहाणीचे समर्थ होत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण या अशा खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांनीच रोवली. निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे. हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी, असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.
आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका! देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी! अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केले आहे.
दरम्यान, फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या महिलेची उध्दव ठाकरेंनी रुग्णालयांमध्ये भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. व देवेंद्र फडणवीसांवर उध्दव ठाकरेंनी टीकास्त्र डागले होते. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. ताबडतोब गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली आहे.