निव्वळ राजकारणासाठी खोटे आरोप; आशिष शेलारांचे शरद पवारांवर उत्तर
मुंबई : राज्यातील कंत्राटी पध्दतीने भरतीवरुन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या मुलांनी काय करायचं, असा सवाल शरद पवारांनी सरकारला विचारला आहे. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, पोलीस भरती ही कंत्राटी स्वरुपाची नाही. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, कोविडचे मृत्यू, तसेच 2019, 2020, 2021 पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे राज्यात आता 18,331 नियमित पोलिस भरती केली जात आहे. पण, प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांना सेवेत दाखल व्हायला विलंब लागतो. नियमित पोलिस भरती होईस्तोवर पोलीस दलाला वार्यावर सोडता येणार नाही. म्हणूनच नवीन भरती करून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सेवेत दाखल होईस्तोवर तात्पुरते म. रा. सुरक्षा महामंडळाकडून मनुष्यबळ घेतले जात आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
केवळ मनुष्यबळ नाही, म्हणून मुंबईची सुरक्षा वार्यावर सोडता येणार नाही. कुठल्याही स्थितीत पोलिस भरती कंत्राटी स्वरूपाची होणार नाही, हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सुद्धा सांगितले आहे. आरोप करा. पण निव्वळ राजकारणासाठी खोटे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही, अशी टीकाही शेलारांनी शरद पवारांवर केली आहै.
काय म्हणाले होते शरद पवार?
६ सप्टेंबर २०२३ रोजी एक निर्णय जाहीर केला. यामध्ये बाह्य यंत्रणाकडून सेवा पुरविण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय झाला. पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या मुलांनी काय करायचं? राज्यात जी यंत्रणा आहे ती सक्षम केली तर अडचण येणार नाही माझी मागणी आहे की कायम स्वरूपी पोलीस भरती करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली होती.