'आदू बाळा', बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये...; शेलारांचा प्रहार
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा खर्च काढत आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना "आदू बाळा" म्हणत त्यांची खिल्ली उडवली. इतक्यावरच मर्यादित न राहता शेलारांनी आदित्य ठाकरे हे बाल बुद्धिपणामुळे, असा आरोप करत असल्याचे प्रत्युत्तरही त्यांनी दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्या अधिकार्यांचा खर्च केलेला आहे.
जपान दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.
बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका, अशी जोरदार टीकाही आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.