मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) अवघे दोनच दिवस बाकी असून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) अपक्ष आमदारावरुन चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. दोघेही अपक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा करत आहेत. अशातच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे (MNS) भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे.
आशिष शेलार यांनी म्हंटले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलो. पक्षाच्या वतीने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांना केली आहे. त्यांनी विनंतीला मान देऊन भाजपच्या राज्यसभा उमेदवारांना मतदान करण्यास आमदारांना सांगितले आहे. ते आम्हाला मतदान करतील. त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. राज यांनी तातडीने निर्णय दिला असून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे तिथे होते. त्यांच्या मतामुळे विजय सुकर होईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
शंभर टक्के उमेदवार जिंकला जाईल, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील आमदारांना नजरकैदेत का ठेवले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यावर आशिष शेलार म्हणाले, पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी यापुढे दिली जाईल. राज्यसभेच्या वेळी उघड मतदान आहे. मात्र, विधान परिषदेत गुप्त मतदान आहे. त्यावेळी बघू महाविकास आघडीचे किती मत अबाधित राहणार, असा अप्रत्यक्ष इशाराच शेलारांनी शिवसेनेला दिला आहे.