'वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन अन् पार्टीशिवाय काहीच दिसत नाही'
मुंबई : जे दुसऱ्याच्या यशाअपशावर सदैव जळत राहतात. ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? असा टोला भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपातर्फे दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आशिष शेलार यांनी आज प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, जे सदैव आभास निर्माण करतात की आम्ही म्हणजे मुंबई ते ना कोरोना काळात मुंबईकरांसोबत नव्हते आणि या सण उत्सवात मुंबईकरांसोबत कुठेच दिसत नाहीत. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपाचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं.
जे टीका करतायत त्यांना मुंबईकारांशी काही घेणे देणे नाही. विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. वरळीच्या आमदारांनी मराठी साहित्य, संस्कृती, लोककला याबाबत केलेला एक कार्यक्रम दाखवावा. जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे? वरळीत आदित्य ठाकरे आता आलेत. त्यांचा अभ्यास कच्चा आहे. पुर्वी वरळीत दत्तात्रय राणे आमदार होते, हे त्यांना माहीत नसावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, हा विषय न्यायालयाचा आहे. मी स्वतः कधीच न्यायालयीन प्रकरणात भाष्य करत नाही. उद्धव ठाकरेंच्या विरोधात न्यायालयात दावा करणारी व्यक्ती ही त्यांची शेजारी आहे, ते मराठी असून मुंबईकर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात शेजाऱ्यानेच न्यायालयात केलेली याचिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात मराठी माणूस आणि मुंबकरांनी केलेले बंड आणि उठाव आहे, असंच मी म्हणेन, असेही आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.