श्रीमंत मनपाला ‘बाजारात’ उभी केली…अशिष शेलारांचा सरकारवर निशाणा
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईकरांना पालिकेची ऐतिहासिक वास्तू म्हणजेच मुख्य इमारत आतून पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी पालिकेतर्फे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशी पर्यटकांना हेरिटेज सफर करता येणार आहे. या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी पालिका प्रशासन आणि राज्य पर्यटन विकास महामंडळात सामंजस्य करार झाला. या निर्णयावरून भाजपचे नेते अशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
'एकीकडे हेरिटेज वॉक सुरू करून ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत… दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला 'बाजारात' उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच..नीट काळजी घेताय ना? कर्ज रोखेच विकताय ना? ७/१२ वर मालक मुंबईकरच राहणार ना?' असे ट्विट अशिष शेलार यांनी केले आहे.
कोरोनामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. उत्पन्नात घट झालेली असताना अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्याने आता बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभारण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. यावर अशिष शेलार यांनी सरकारला टोमणा मारलाय.
जगातील सर्वात श्रीमंत अशा महापालिकेचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार आहे. लॉकडाऊनमुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. त्यातून राज्य सरकारचा जीएसटीचा काही निधी अद्याप केंद्राकडे आहे. त्यामुळे सर्वत्रच आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील किती निधी खर्च झाला आणि किती उत्पन्न जमा झाले याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पण त्याचबरोबर पुढील वर्षीचा अर्थसंकल्प कसा असेल, याबाबतही उत्सुकता सर्वांना आहे.