मराठी-गुजराती वादामागे मोठे षडयंत्र; आशिष शेलारांचा गौप्यस्फोट
मुंबई : मुलुंड पाठोपाठ आता घाटकोपरमध्ये देखील मराठी गुजराती वाद पेटला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड तोडला आहे. यामुळे मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे. मराठी-गुजराती वादामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप शेलारांनी केला आहे. ते लोकशाही पॉडकास्टमध्ये बोलत होते.
काय म्हणाले आशिष शेलार?
हे जे चाललंय ते 100 टक्के षडयंत्र आहे. याविरोधात आंदोलन सुरु आहेत ती एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग आहे, असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. तर, मुंबईत मराठी भाषेतील बोर्डचा आग्रह याला भारतीय जनता पार्टीचे समर्थन आहे. किंबहुना आम्ही त्याच्यासाठी भूमिका घेऊ लोकांपर्यंत जाऊ, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
हिंदू मत एकत्रित होऊन भाजपाचा विजय होत असे तर भाषेवरुन वाद उकरुन काढायचा आहे आणि त्यामुळे हे षडयंत्र कटकारस्थान चालू आहे. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि त्याच्यावरील तोडही भाजपकडे आहे, असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, घाटकोपरमधील उद्यानातील गुजराती बोर्ड तोडल्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणी असलेले गुजराती बोर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडं मालाडमध्येही बस थांब्यावर गुजराती फलक तोडण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी-गुजराती वादाला फोडणी मिळताना दिसते आहे.