राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवे - बावनकुळे
राज्यात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना, राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण येत आहे. अशातच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. 'आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच नेतृत्व केले पाहिजे', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.याआधी देखील भाजपच्या अनेक नेत्यांकडून फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं होत, अशी इच्छा बोलून दाखवण्यात आली होती. भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून आज ही नाराजी कायम असल्याची बावनकुळेंच्या या वक्तव्यांनी समोर येत आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ''पुढच्या काळात मी मुख्यमंत्री झालो पहिजे, असा काही जणांनी उल्लेख येथे केला. पण कर्तृत्ववान अष्टपैलू असे फडणवीस हे माझ्या पाठीशी उभे राहिले. मला त्यांनी उर्जा दिली. आज आपले कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवे.
मी जबाबदारीने सांगतो की जात, धर्म पंथाच्या बाहेर जाऊन एक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते हे फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सलामच करायला पाहिजे. यांच्यामुळेच आम्ही. जेव्हा माझे तिकीट कापले तेव्हा वाटले नव्हते की, परत मी आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष होईल म्हणून पण मला मोदी आणि वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली.'' अशी भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली.
आम्ही अमेठी घेतली आहे, तर बारामतीही घेऊ शकतो
आधी ते नाशिक मध्ये बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, मी बारामतीत गेल्यावर फक्त, `बारामतीत घडी बंद पडेल` एव्हढेच म्हटले होते. अन्य काहीही टिका केली नाही. मात्र शरद पवार, अजितदादा, सुप्रियाताई या सगळ्यांनी फारच मनाला लाऊन घेतले. खरं तर त्यांनी माझे विधान एव्हढे गांभिर्याने का घेतले, हेच समजत नाही. आम्ही अमेठी घेतली आहे, बारामतीही घेऊ शकतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी यावेळी केले होते.