देवेंद्र फडणवीस बोलतानाच सभागृहाची बत्ती गुल; रोहित पवारांनी साधला निशाणा
नागपूर : हिवाळी अधिवेशानाचा आज दुसरा दिवस असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडताना दिसत आहे. परंतु, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असतानाच सभागृहात वीज गेली. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस विद्युत विभागातील नोकर भरतीबद्दल बोलत असतानाच विधानसभातील सभागृहातील लाईट गेली. त्यामुळे हा केवळ योगायोग मानायचा का, असा उपस्थित केला जात आहे. तर, यावरुन रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. खुद्द ऊर्जामंत्री हिवाळी अधिवेशनात बोलत असताना वीज गेल्याने सभागृहातील माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं. वीज गेल्यावर कशा अडचणी येतात हे प्रत्यक्ष सभागृहाला अनुभवता आलं. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटाला विजेसाठी दुजावं लागतं, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, ऐन अधिवेशनात वीजेच्या समस्येमुळे तब्बल ५० मिनिटं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. यावर शासनाने खुलासा केला आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विधानभवनात बत्ती गुल झाल्याचे स्पष्टीकरण शासनाने दिला आहे.