‘त्या’ निकषाने शिवसेनेलाच मिळणार शिवतीर्थावर परवानगी? सावंतांचा दावा

‘त्या’ निकषाने शिवसेनेलाच मिळणार शिवतीर्थावर परवानगी? सावंतांचा दावा

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
Published on

मुंबई : दसरा मेळव्यावरुन शिवसेना व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच शिंदे गटाला बीकेसी येथील मैदानात मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास ठाम असल्याती दिसत आहे. अशात शिवसेना नेते अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, आमचा कोणताही गट नाही, आमची शिवसेना आहे. बीकेसी मैदानावर परवानगी मिळावी यासाठी कामगार सेनेने अर्ज केला होता. पण, एमएमआरडीने शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला म्हणून त्यांना परवानगी मिळाली,

हाच निकष महापालिकेने आम्हालाही लावावा व शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी द्यावी. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नसली तरीही नकारही देण्यात आला नाही. तसेच, आम्हाला तिथे मेळाव्यासाठी परवानगी नाकारली तर पुढचा निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही त्यांनी महापालिकेला आणि शिंदे सरकारला दिला. परंतु, शिवतीर्थावर परवानगी नक्की मिळेल, अशी आशा सावंत यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी न दिल्यानं दसरा मेळाव्यासाठी पर्यायी मैदान म्हणून दोन्ही गटांकडून बीकेसी येथील मैदानासाठी एमएमआरडीकडे अर्ज करण्यात आले होते. मात्र, एमएमआरडीएने शिंदे गटाने अर्ज केलेल्या मैदानासाठी परवानगी देताना शिवसेनेचा परवानगी अर्ज फेटाळला आहे. याउलट शिवसेनाही आता शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम झाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्या वरून आता मुंबईत मोठे रामायण होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com