अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाले, हे नाते आम्ही पुढे नेऊ
मुंबई : राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नवे समीकरण पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. हे नाते आम्ही पुढे नेऊ. उद्धव ठाकरे हे सिंहाचे पुत्र आहेत. उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा आहे. देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. हे नाते आम्ही पुढे नेऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले आहे.
केंद्रावर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, भाजप फक्त गुंडगिरी करतो. ईडी आणि सीबीआयचा वापर भ्याड लोक करतात. दिल्लीच्या जनतेने आम्हाला एमसीडीमध्ये बहुमत दिले. स्थायी समितीत आमचे बहुमत आहे. या देशात पक्ष फक्त निवडणुकीचा विचार करतो. सगळ्या देशाला गहाण ठेवलं जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी कशी मजबूत करता येईल यावर चर्चा झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मार्चच्या अखेरीस उद्धव ठाकरे मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची मोठी बैठक आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.