महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने केली 'या' मंत्र्यांची नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागावरील बेळगावचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दोन मंत्री नियुक्ती केली आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने सीमा प्रश्न सोडवण्याकरता एक समिती गठित केली. राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. त्याची परिस्थिती सर्व समितीला सांगितली. यावर पुढे काय करायचं याबद्दल चर्चा झाली. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाच्या सुनावणी घेऊ शकते का नाही याबद्दल खटला सुरू आहे. सीमा भागाचेही काही प्रतिनिधी होते त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या. काही मंत्र्यांना त्याबद्दल कायमस्वरूपी जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. या मुद्यावर सर्व राजकीय पक्षांचे एक मत आहे. याबद्दल सर्व पक्ष शिष्टमंडळाने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे भेट घ्यावी याची चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पुर्नरचना करून समितीत मोठ्या नेत्यांचा समावेश केला होता. यामध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री दिपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तर, याआधीही महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागाप्रश्नी दोन्ही राज्यांमध्ये बैठक झाली होती. यावेळी सीमाप्रश्नासह अलमट्टी धरण, हत्तींच्या विषयांवर चर्चा होणार होती.