शिवसेनेच्या उपनेत्याला अँटी करप्शन ब्युरोची नोटीस
मुंबई : शिवसेना नेते वैभव नाईक यांच्यांनंतर आणखी एका नेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) नोटीस आली आहे. राजापूरचे आमदार आणि शिवसेनेच्या उपनेते राजन साळवी यांना एसीबीची नोटीस आली आहे. मालमत्तेच्या चौकशी संदर्भात ही नोटीस मिळाली असून 5 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शिंदे-भाजपच्या सत्तास्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात कोकणातून आणखी एक आमदार प्रवेश करण्याची चर्चा असून यात राजन साळवी यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, वेळोवेळी राजन साळवी यांनी चर्चा फेटाळून लावत आपण उध्दव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु,रिफायनरी प्रकल्प उभारण्यावरून राजन साळवी यांनी शिवसेनेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे.
राजन साळवी यांनी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. तर, खासदार विनायक राऊत प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. अशातच, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही राजन साळवी उपस्थित होते. यामुळे पुन्हा राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, राजन साळवी यांनी या चर्चा पुन्हा फेटाळून लावल्या आहेत. अशातच मालमत्तेच्या चौकशी संदर्भात राजन साळवींना एसीबीची नोटीस आली आहे. यामुळे या घडामोडींना महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, यापुर्वी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीने वैभव नाईक यांना नोटीस पाठवली असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी त्यानंतर कुडाळ येथील एसीबीच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. यावेळी वैभव नाईक यांच्यावर सरकार दबाव आणू पाहत आहे, असा आरोप देखील शिवसेनेकडून करण्यात आला होता.