अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा; केसीआर यांची मोदी सरकारकडे मागणी
संजय देसाई | सांगली : देशाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कळले नाहीत, असे मत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी तेलंगणाच्या मुख्यमंत्री केसीआर यांनी केली आहे. ते सांगलीच्या वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सभेत बोलत होते.
सांगलीच्या वाटेगाव या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी हजेरी लावली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला केसीआर पुष्पहार घालून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांचे घर आणि शिल्पसृष्टी या ठिकाणी मुख्यमंत्री केसीआर यांनी भेट देऊन साठे कुटुंबियांशी देखील चर्चा केली. त्यानंतर आयोजित अभिवादन सभेत बोलताना केसीआर यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे रशियाला कळले. मात्र, आपल्या भारताला कळले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गोरगरीब वंचितांसाठी निर्माण केलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देशातल्या अन्य भाषेमध्ये भाषांतर करून देशासह जगापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मात्र, याबाबतीत महाराष्ट्र सरकारचं हे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही केसीआर यांनी केली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा खऱ्या अर्थाने गौरव करायचा असेल तर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि केंद्र सरकारकडे आपली मागणी असणार आहे. यासाठी भारत राष्ट्र समिती तेलंगणा मधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवेल. पण, महाराष्ट्र सरकारने देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या बाबतीत शिफारस पत्र केंद्र सरकारला पाठवायला हवं, असे मत देखील केसीआर यांनी व्यक्त केले आहे.