किरीट सोमय्यांना आमची नाक घासून माफी मागावी लागेल : अनिल परब
मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका किरीट सोमय्यांनी घेतली मागे घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या प्रकरण आपल्या अंगाशी येतंय म्हणून मागे घेतायत. पण, एक वेळ अशी येईल की सोमय्यांना आमची नाक घासून माफी मागावी लागेल, असे परबांनी म्हंटले आहे.
मी सुरुवातीपासून सांगत होतो की साई रिसॉर्टसोबत माझा काही संबंध नाही. पण, जाणूनबुजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. या प्रकरणात गैर व्यवहाराचे पैसे लावले, असा आरोप केला. पर्यावरणाचा ऱ्हास केला, असा आरोप केला. ईडीने आमची चौकशी केली. गेली दीड वर्ष या प्रकरणात नाहक बदनामी केली. याबद्दल मी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्यांनी प्रकरण आपल्या अंगाशी येतंय म्हणून मागे घेतायत, असे अनिल परब यांनी म्हंटले आहे.
ज्या रिसॉर्टवरून दावे केले जात आहेत ते चुकीचे आहेत. परंतु, त्याची ईडीने चौकशी सुरु केली व त्यानंतर अनेक खोटे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे खोटे आहेत याविषयी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. मी सरकारमध्ये असताना आम्हाला बदनाम करण्याचा हेतू त्यांचा होता. किरीट सोमय्या यांना हळू-हळू सर्व प्रकरण मागे घ्यावे लागतील कारण ते चुकीचे आहेत.
एक वेळ अशी येईल की किरीट सोमय्यांना आमची नाक घासून माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये दाव्यानुसार द्यावे लागतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
सदानंद कदम यांना सभा झाल्यावर अटक झाली होती. आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल. जो अब्रू नुकसानीचा दावा आहे त्यावर आम्ही ठाम आहे, असेही अनिल परबांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिंदे गटात कोणी आवाज चढवला तर त्यांच्या नाड्या दाबल्या जातील कारण अपात्रतेचा निर्णय भाजपच्या हातात आहे. लोकसभेला त्यांनी 22 जागा मागितल्या आहेत. निवडणुका लागू द्या मग कळेल की कितीजण शिंदे कडून लढतायत व कितीजण भाजपकडून लढतील ते पाहा. शिवसेनेत त्यांची घुसमट होत होती म्हणून ते तिकडे गेले आहेत किती जण कशावर लढतील ते पाहा, असा निशाणा अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.