अनिल बोंडे यांचं राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य; विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले...
भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे. असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, संविधान रक्षणाची भाषा करणारे, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा आता भाजपचे राज्यसभा अनिल बोंडे यांनी केली आहे.
महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही. एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुलजी गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडला अजून अटक झालेली नाही म्हणूनच अनिल बोंडेची हिंमत वाढली आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल गल्लीतले आमदार अशी भाषा करतात तरी राज्यातील - देशातील पोलीस प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. राज्याचे पोलिस प्रशासन गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीतील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार? असे विजय वडेट्टीवार म्हणाले.