Andheri By Election: अंधेरी पुर्व पोटनिवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर?
राज्यातील सत्तापालटानंतर अंधेरी पोटनिवडणुक हा राज्यभर चर्चेचा विषय बनला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. तर, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, आता अंधेरी पुर्वच्या पोट निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आला आहे. एका अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे निवडणुक रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंंधेरी पोटनिवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराने केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. या उमेदवाराने शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी निवडणुक आयोगाला लिहीलेल्या पत्राची आता आयोगाने दखल घेतल्यानं नवं वळण आलं आहे.
भाजपने उमेदवार मागे घेतल्यानंतरही 7 उमेदवार रिंगणात:
भाजपने माघार घेतल्यानंतर 7 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. तरीही अद्याप 7 जण रिंगणात असल्याने निवडणूक होणार आहे. पण, ऋतुजा लटके यांच्यासमोरचं मोठं आव्हान असलेले भाजपचे उमेदवार मुरजी हे या निवडणुकीतून बाहेर पडले असल्यानं ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता निवडणुकच रद्द झाली तर ठाकरे गटासाठी हा चिंतेचा विषय ठरु शकतो.