अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! ऋतुजा लटकेंसमोर 7 उमेदवारांचे आव्हान

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! ऋतुजा लटकेंसमोर 7 उमेदवारांचे आव्हान

निवडणुकीच्या रिंगणात अद्यापही 7 अपक्ष उमेदवार उभे आहेत. अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याने शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऋतुजा लटके यांना निवडणुकीला सामोरे जावेच लागणार आहे.
Published on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेनंतर भाजपनेही एक पाऊल मागे घेतले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु, निवडणुकीच्या रिंगणात अद्यापही 7 अपक्ष उमेदवार उभे आहेत. अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याने शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऋतुजा लटके यांना निवडणुकीला सामोरे जावेच लागणार आहे.

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजप व शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरण्यात आला. परंतु, राज ठाकरे व शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक व शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर आज शेवटच्या क्षणी भाजपने अंधेरी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे आता भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, आणखी 14 उमेदवार रिंगणात असल्याने आज दुपारी 3 वाजेपर्यंत इतर उमेदवारांनीही माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, आता मुदत संपली असून 7 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. तरीही अद्याप 7 जण रिंगणात असल्याने निवडणूक होणार आहे. पण, ऋतुजा लटके यांच्यासमोरचे मोठं आव्हान असलेले भाजपचे उमेदवार मुरजी हे या निवडणुकीतून बाहेर पडले असल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com