रिपाइं ऐक्यावर माझा विश्वास नाही, आनंदराज आंबेडकरांचे विधान
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. कार्यक्रम पार पडल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत घेत रिपाइं ऐक्याच्या विषयावर रोखठोक विधान केले आहे. रिपाइं ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. अशा शब्दात रिपाइं ऐक्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आनंदराज आंबेडकर?
रविवारी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रिपाइं ऐक्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रयोग करण्यात आले. परंतु, या ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एका जागी आणण्यावर माझा विश्वास आहे. असे मत त्यांनी यावेळी मांडले.
पुढे ते म्हणाले की, सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे. सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ते विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला विरोध करणारे हे देशद्रोही अशी वागणूक सध्या देशात विरोधकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी आमच्याच मंडळींचा वापर ते करीत असल्याचे सांगत त्यांनी रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.