फडणवीसांची जादू कोकणात चालली, मात्र नागपुरमध्ये नाही? दया कुछ तो गडबड है'
मुंबई : नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. सुधाकर अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. यामुळे बालेकिल्ल्यात भाजपला हादरा बसला आहे. यावरुन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले. प्रथम त्यांचे अभिनंदन. ईव्हीएमपेक्षा बॅलेटवर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने ईव्हीएमऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे.
देवेंद्र फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली, जगभरात चालली मात्र नागपुरमध्ये का नाही चालली ? दया कुछ तो गडबड है, असा निशाणा अमोल मिटकरी यांनी साधला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मतांमध्ये 14069 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांना 6366 मते मिळाली. यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. तर, नाना पटोले यांनी भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी, असे टि्वट करत आनंद व्यक्त केला आहे.