अजित पवारांसोबत गेलेले अमोल कोल्हेंचा युटर्न; ट्विट करत केले स्पष्ट
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अजित पवारांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते. तर, खासदार अमोल कोल्हेही अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते. परंतु, आज अमोल कोल्हे यांनी सूचक ट्विट करत आता युटर्न घेतला आहे.
काय आहे अमोल कोल्हे यांचे ट्विट?
अजित पवारांसोबत अमोल कोल्हेंनी राजभवनात हजेरी लावली होती. यामुळे कोल्हेही अजित पवारांच्या गटात सामील असल्याची चर्चा होती. परंतु, आज ट्विट करत अमोल कोल्हेंनी नक्की पाठिंबा कोणाला? हे स्पष्ट केले आहे. जेव्हा मन आणि बुध्दीशी युद्ध होते तेव्हा आपल्या हृदयाचे ऐका. कदाचित बुध्दी कधी कधी नैतिकता विसरते. पण हृदय कधीच विसरत नाही. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपण सदैव शरद पवारांसोबतच असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, राजकीय भूकंपानंतर शरद पवार आज प्रथमच सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावेळी आता शरद पवारांसोबत आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते. हे तीनही आमदार काल अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित होते. यामुळे दोन दिवसांत आमदार परतणार हा शरद पवारांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.