देशाला मणिपूर प्रकरणातील सत्य...; काय म्हणाले अमित शहा?
नवी दिल्ली : मणिपूरमधील घटनेप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या विधानाची मागणी करत आहेत. तर, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्ष या मुद्द्यावर चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप होत आहे.
विरोधी पक्षांनी आज मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान मोदींनी चर्चा करण्याची जोरदार मागणी केली. या मागणीबाबत या पक्षांच्या सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले, मी सभागृहात या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे. मी विरोधकांना विनंती करतो की, या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यावी. देशाला या संवेदनशील प्रकरणातील सत्य माहित असणे महत्त्वाचे आहे. पण विरोधक या मुद्द्यावरून का पळून जात आहेत हे मला समजत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
मात्र, विरोधक आपल्या मागणीवर ठाम असून काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पंतप्रधानांनी येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा केली तर आभाळ फाटेल का? या मुद्द्यावर जगभर चर्चा होत आहे. आज मणिपूरमधील गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी यावे हीच आमची छोटीशी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर प्रकरणावर संसदेत निवेदन द्यावे. एवढ्या संवेदनशील विषयावर त्यांचे मौन कशावरून दिसून येते, असे त्यांनी म्हंटले आहे. विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.