पंतप्रधान मोदींच्या विकास मॉडेलवर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक हा विजय : अमित शहा
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीचा आज निकाल लागत आहे. गुजरातमधील कलानुसार भाजपने रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल सुरु असून सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. देशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे. या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भाजप नेते व गृहमंत्री अमित शहा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहा म्हणाले की, इतिहास घडवण्याचे काम गुजरातने नेहमीच केले आहे. गेल्या दोन दशकात मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले. या पंतप्रधान मोदी यांच्या विकास मॉडेलवर जनतेचा अढळ विश्वासाचे प्रतीक हा विजय आहे.
पोकळ आश्वासने, भडकपणा आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातने नाकारले आहे आणि विकास आणि लोककल्याणाचे चरितार्थ करणाऱ्या भाजपला अभूतपूर्व जनादेश दिला आहे. या प्रचंड विजयाने हे दाखवून दिले आहे की, प्रत्येक वर्ग मग तो महिला असो, तरुण असो वा शेतकरी, सर्वजण मनापासून भाजपसोबत आहेत, असा टोलाही विरोधकांना शहा यांनी लगावला आहे.
या ऐतिहासिक विजयाबद्दल मी गुजरातच्या जनतेला सलाम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरातच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. राज्यातील 182 जागांपैकी भाजप 150 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 20 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी सात जागांवर आघाडीवर आहे. तर इतरांना तीन जागा मिळत आहेत. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे.