गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी; अंबादास दानवेंची खोचक टीका
राज्यात अभुतपूर्व गोंधळानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापन होऊन 41 दिवस झाल्यानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळावर शिवसेनेच्या मुखपत्र सामनामधून टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी खरमरीत विधान केले. सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर केली होती. शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती मिळाल्याने सामनातून ही टीका करण्यात आली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
माध्यमांशी बोलतांना पाटील यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला आहे. याच गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. त्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
अंबादास दानवेंचा शेलारांना प्रश्न ?
शेलारांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करू नये. ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे. जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं? ही कीड शेलारांनी दूर केलीय का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी शेलारांना केला आहे.