आधी चक्की पिसिंग पिसिंग, आता अजित दादा किसिंग किसिंग चालू; कोण म्हणाले असं?
छत्रपती संभाजी नगर : आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं. आता अजित दादा किसिंग किसिंग चालू आहे. अजित दादा सोबत किसिंग चालू आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. दानवेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा. राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाता खाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तार हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे पुरावे घेऊन यायचं, आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं, आता अजित दादा किसिंग किसिंग चालू आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिंकणार. शिंदे गट लढेल किंवा भाजप लढेल आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुरून उरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड माणूस चांगला, पण ते नेता नाही. ते डॉक्टर चांगले आहेत, चांगले बालरोग तज्ज्ञ आहेत. पण नेतृत्व करू शकत नाही. भावना गवळी प्रकरणातील सीए आणि किरीट सोमय्या हे दोघे वादग्रस्त होते, सीए जेलमध्ये होते तर किरीट सोमय्याचे तुम्हाला माहीतच आहे. किरीट सोमय्या शिवसेनेला घाबरतात म्हणून गुपित दौरा, खुला करायचा असता नाहीतर शहरात येऊ शकले नसते, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
आमदारांचे वागणे आणि त्यांच्यावर असणाऱ्या केसेस असता कुणावर कारवाई झाली. जनतेने याकडे लक्ष द्यायला हवे, सर्वसामान्यांनी जर असं कृत्य केलं असतं तर सरकारने काय कारवाई केली असती. पोलीस जर सरकारच्या ताटाखालचा मांजर बनत असेल पोलीस जर सरकारचं गुलाम बनत असेल, पोलीस सुद्धा सरकारची हुजरेगिरी करत असेल यामुळे जनता योग्य वेळी न्याय देईल, असेही दानवेंनी म्हंटले आहे.
भाजपाचा आणखी ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि जे जुने लोक आहेत त्यांना कुठेतरी स्टोरेजमध्ये टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे. सगळे चेहरे नवीन आहेत. मूळ लोक बोटावर मोजणारे आहेत. भाजप संघटना मोठी करणारे लोक कुठे आहे ? या गोष्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करणारे आहेत. भाजपचे कोणते कोणते टोलनाके आहेत हे जनतेला माहित आहे, येणाऱ्या काळात ते बरोबर समोर येतील, काल कॅगचा अहवाल केंद्राचा आलेला आहे, अशीही टीका दानवेंनी केली आहे.