अब्दुल सत्तारांच्या विधानावर दानवेंचे टीकास्त्र; म्हणाले...
मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे पडसाद विधीमंडळात उमटले असून विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचे टीकास्त्र दानवेंनी सोडले आहे.
हे शेतकरी विरोधी सरकार आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्याबद्दल पण ते चुकीचं वक्तव्य ते करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे, असा निशाणा दानवेंनी साधला आहे.
तर, भाजपाचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, राहुल कुल यांच्या साखर कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट हे सरकारने दाखवलं पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सदा सरवनकर यांच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली होती. मग, आत्ता त्यांना क्लीनचिट कशी मिळाली? हे सरकार शेतकरी आणि सामान्य लोकांच्या विरोधातील आहे, अशी टीकाही दानवेंनी केली आहे.