विरोधक रडीचा डाव खेळताहेत; अंबादास दानवेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र
मुंबई : राज्यातील उद्योग प्रकल्प बाहेर जाण्याची प्रकरणं सुरू आहेत. वेदांता फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप व शिंदे सरकारवर टीका केली जातेय. अशातच तत्कालीन ठाकरे सरकारने दिरंगाई केल्याने वेदांता प्रकल्प बाहेर गेल्याचा खुलासा एमआयडीसीने माहिती अधिकारात केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, चुकीची माहिती आहे. बनवलेली बातमी आहे. यासंदर्भात सर्व माहिती आदित्य ठाकरे यांनी परवाच जाहीर केली. आपलं अपयश झाकण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली आहेत, असा थेट आरोप त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दावोसला जाऊन किती उद्योग आणले, किती पैसा खर्च केला याचा हिशोब द्या, असा सवाल आदित्य ठाकरे यांना केला होता. यावर बोलताना दानवे म्हणाले, दावोसला महाराष्ट्र सरकारचं प्रतिनिधी मंडळ गेलं होतं. आदित्य ठाकरे एकटे नव्हते, उद्योगमंत्री सुभाष देसाई व नितीन राऊतही होते. उदय सामंत बोलताहेत ते थोतांड आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
शिवसेना ही सेना आहे आणि शिवसेनेला कधी तयार राहायला सांगावं लागत नाही. कोणत्याही क्षणाला सेना तयार राहते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोणत्याही लढ्याला तयार आहे. उद्धव ठाकरे सेनापती आहेत, ते बाहेर पडल्याने नक्कीच आम्हाला हुरूप येतो. 26 नोव्हेंबरला चिखली येथे सभा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
तर काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत, असा दावा अनिल परब यांनी केली होती. याबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनी म्हंटले की, रडीचा डाव विरोधक खेळत आहेत. पण, विजय शिवसेनेचा होणार आहे. ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केले. विरोधकांनी उमेदवार दिला आणि नंतर मागे घेतला. पण, आज काही लोकांना भाजपने हाताशी धरून नोटाचा वापर करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्याचे ऑडिओ क्लिप समोर आले आहेत. नेहमीप्रमाणे भाजपच्या सवयीप्रमाणे नोटांचा देखील वापर होत आहे, असा देखील दावा त्यांनी केला आहे.