शिवरायांबरोबरच मोदी, सावरकर, आंबेडकरांचाही फोटो नोटांवर छापा; भाजप आमदाराची मागणी
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर गांधीजींसोबत गणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली होती. यानंतर नोटावरुन राजकारण सुरु झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आता आपआपली मते मांडली आहेत. यात भाजप नेते राम कदम यांनीही ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर गांधीजींसोबत गणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेशजींचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल, असे त्यांनी म्हंटले होते. यावरुन त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत होती. परंतु, दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणेंनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापावा, अशी मागणी केली.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटेवर छापण्याची मागणी केली आहे. तर, राम कदम यांनी ट्विटरवरुन चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत. या नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यावीर सावरकर आणि पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. सोबतच अखंड भारत, नया भारत, महान भारत, जय श्रीराम, जय मातादी, असे कॅप्शन दिले आहे.
काय म्हणाले होते?
दिवाळीला आपण सर्वजण गणपती आणि लक्ष्मीची पूजा करतो. सर्वांनी शांती आणि आनंदासाठी देवाकडे प्रार्थना केली. कुटुंबासह आम्हीही देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. आपण पाहतो की जे व्यवसाय करतात ते लक्ष्मी-गणेशाची मूर्ती ठेवतात. याच आधारावर या दोघांचे चित्र नोटांवर घेतले पाहिजे, असे केजरीवाल यांनी म्हंटले आहे.