अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाबाबात भाष्य; म्हणाले, 2004 सालीच...
पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री पद हा नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आत्तापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी अद्याप मिळालेली नाही. विरोधक नेहमीच यावरुन अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. यावर आज स्वतः अजित पवारांनी भाष्य केले आहे.
२००४ साली राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद सोडायला नव्हते पाहिजे. तेव्हा कोण असतील त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तरी चाललं असत. तेव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता तर आजपर्यंत बदलला नसता. तेव्हा आमचे अनेक वरिष्ठ नेते बोलतील तेव्हा आम्ही फक्त 'जी' म्हणायचो, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, प्रयत्न करणं आपल्या हाती असलं तरी नशीबाची पण साथ लागते, अशी खंतही अजित पवारांनी बोलून दाखवली.
दरम्यान, २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपद आल्यास काय कराल? अशी विचारणा अजित पवारांना करण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. आत्याबाईला मिशा असत्या तर छान झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे. झाल्यावर दाखवतो काय करायचंय ते, असे मिश्कील उत्तर अजित पवारांनी दिले.