Ajit Pawar
Ajit Pawar Team Lokshahi

नागपूरच्या सभेत भाषण करणार नाहीत; अजित पवार म्हणाले, आमचं आधीच ठरलं...

इथे नागपूरला आमच्याकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करतील. कारण विदर्भातली सभा आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना त्यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पवार राज्य सरकारबरोबर जाणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच मविआची वज्रमुठ सभा होत आहे. दरम्यान यासभेत अजित पवार भाषण करणार नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क- वितर्क लावण्यात येतायत. त्याच चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar
'पुढील 15 दिवसात महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय स्फोट होणार' प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

काय म्हणाले अजित पवार?

नागपूरच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. त्यावर अजित पवारांनीच सकाळीच नागपूरमध्ये दाखल होत या चर्चा खोट्या ठरवल्या. मात्र, सभेत आपण भाषण करणार नसल्याचं त्यांनी माध्यांना सांगितलं. अजित पवार म्हणाले की, 'अधिवेशन काळात एकत्र भेटून आम्ही या सभांच्या तारखा अंतिम केल्या. मविआच्या वतीने जी काही भूमिका मांडायची, ती आपण एकत्रपणे मांडू असं ठरलं. सभांमध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषणं करायची. ती कुणी दोघांनी करायची ते त्या त्या पक्षानं ठरवायचं. छत्रपती संभाजी नगरला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांनी भाषण केलं. मी आणि धनंजय मुंडेंनी भाषण केलं. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरैंनी भाषण केलं. अंबादास दानवेंनी भाषण केलं नाही. दोघंच बोलायचं म्हटल्यावर दानवे जरी छत्रपती संभाजीनगरचे असले, तरी त्यांनी दोघांची नावं दिली होती. आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं की आपलं ठरलंय तर ठरल्याप्रमाणे आपण वागू. असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, इथे नागपूरला आमच्याकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करतील. कारण विदर्भातली सभा आहे. अनिल देशमुख विदर्भातले आहेत आणि जयंत पाटील आमचे प्रांताध्यक्ष आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे भाषण करतील. दुसरे कोण करणार हे मला माहिती नाही. काँग्रेसकडून बहुतेक नाना पटोले आणि सुनील केदार भाषण करतील. नाना पटोले प्रांताध्यक्ष आहेत. गेल्या वेळी त्यांनी भाषण केलं नव्हतं. सुनील केदारांनी इथली जबाबदारी घेतली होती, त्यामुळे ते भाषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सभा आटोपशीर व्हावी, सभा लांबू नये आणि येणाऱ्या श्रोत्यांना, नागरिकांना भाषणं मर्यादित वेळेत ऐकायला मिळावी, हा त्यामागचा दृष्टीकोन आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com