तो बच्चा आहे; अजित पवारांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
पिंपरी चिंचवड : अजित पवार मित्रमंडळ भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याची टीका रोहित पवारांनी केली होती. या टीकेवर आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, इतका तो मोठा झालेला नाही. तो बच्चा आहे, माझे प्रवक्ते त्यावर बोलतील, असा टोलाच अजित पवारांनी लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. काल पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या झाली, त्यातील गुन्हेगारांना तातडीनं अटक करण्यात आली. त्याची कारणं ही समोरे आलेली आहेत. काही राजकीय कार्यकर्ते माहिती नसताना काहीही बोलतात. धादांत खोटं बोलतात. मेट्रो निधीबाबत तेच घडलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याकडे लक्ष द्यायला हवं, ते लक्ष देत नसतील तर पीआयएल करता येईल. पण मी तातडीनं त्यात लक्ष घालतो.
तर, पिंपरी चिंचवडमधील नाट्य संमेलनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता होती. मात्र अजित पवार गैरहजर राहिल्याने एकच चर्चा रंगली होती. यावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. आजच्या 100व्या नाट्य संमेलनावेळी मी वेगळ्या कार्यक्रमात होतो. शरद पवार साहेब तिथं होतो म्हणून मी आलो नाही, असं काही नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये पवार साहेब असताना मी तिथं जातोच. उगाचंच काहीही गैरसमज पसरवू नका, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे.
दरम्यान, भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी आमदार कांबळे यांनी माझ्या समोर कोणाला मारलं असतं तर मी शांत बसलो असतो का? मी पुढच्या कार्यक्रमाच्या घाईत होतो. त्यामुळं राष्ट्रगीत होताच बाहेर पडलो, असे म्हंटले आहे.