उद्धवजींचा पोपट मेला; फडणवीसांच्या टीकेचा अजित पवारांकडून समाचार, कुठं मेलय दाखवा
अमोल धर्माधिकारी | पुणे : उद्धव जी यांना पोपट मेला असं कुणी सांगतच नाहीय. उध्दव ठाकरेंची शिवसेना ही शिल्लक सेना आहे, असे टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले होते. याचा समाचार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला आहे. पोपट मेला नाही, मैना मेली नाही, मोर मेला नाही. सगळं जिवंत आहे. कुठं मेलय दाखवा, असा जोरदार टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे. पोपट मेलाय म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, असेही त्यांनी म्हंटले आहे.
त्र्यंबकेश्वरबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, धुप दाखवण्याची परंपरा 100 वर्षांची. समाजात तेढ निर्माण केली जातेय. ते ताबडतोब थांबले पाहिजे. काही लोकांनी गोमूत्र शिंपडले. कोणी काय शिंपडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही राजकीय पक्षांचे लोक वातावरण अधिक कलुषित कसे होईल याचा प्रयत्न करत आहेत. त्र्यंबकेश्वरच्या आमदारांनी सांगितले की ही 100 वर्षांपासूनची परंपरा आहे, असेही अजित पवारांनी सांगितले आहे. दलवाईनी त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले. त्याचे कौतुक आहे. या देशाला पुन्हा शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकरांसारख्या नेत्यांची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. यावर अजित पवार यांनी जागावाटपाबाबत सर्व अफवा आहेत. तीन पक्षीय समिती याबाबत चर्चा करेल. संजय राऊत यांची मागणी आहे याबाबत चर्चा करुन मार्ग काढू, असे त्यांनी म्हंटले आहे. कर्नाटकचा निकाल लागला. बजरंगबलीचे राजकारण लोकांनी नाकारले, असा निशाणाही अजित पवारांनी भाजपवर साधला आहे.