अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ? राजभवनावर दाखल
मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच, राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. यामुळे अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अजित पवारांनी पक्षसंघटनेत जबाबदारी देण्याची मागणी केली होती. यानंतर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी जोर पकडत आहे. अशातच, आता राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आपले दौरे रद्द केले. तर, शरद पवार यांनी या बैठकीबाबत काहीच कल्पना नसल्याचे म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील नऊ मंत्रीही शपथ घेणार असल्याचे समजते आहे.