Ajit Pawar on Raigad NDRF: 'एनडीआरएफ'चा बेसकॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार : अजित पवार

राज्यातील आपत्कालीन स्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Published by :
Team Lokshahi

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर लक्ष ठेऊन आहे.

प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगाने सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाही.

आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत, याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा 'एनडीआरएफ'चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहीतीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com