अजितदादांनी का घेतली पवारांची भेट? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी झाली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच राजकीय गदारोळ निर्माण झाला. राष्ट्रवादी काँगेस नेते अजित पवार यांनी 9 आमदारांना सोबत घेत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीतही गुंतागुंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आता पहिल्यांदाच या बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली आहे. याच भेटीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ' अजित पवारांच्या गटाने झालेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली. यासोबतच त्यांनी मार्ग काढण्याची देखील विनंती केली आहे. अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान, याभेटीबाबत शरद पवारांनी कुठलीही माहिती दिली नाहीये.
पुढे ते म्हणाले की, 'अचानकपणे ते येऊन भेटले आहेत. कोणाचा काय उद्देश होता, यावर आज सांगणं अवघड आहे. पण, सर्वांनी दिलगीरी आणि खंत व्यक्त केली आहे. तसेच, सर्वांनी एकत्र यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. असेही ते म्हणाले आहे.