Monsoon Session: अजित पवार गट बजावणार आमदारांना व्हीप; शरद पवार गटाला लागू होणार?
मुंबई : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर पहिलेच पावसाळी अधिवेशन उद्या पार पडणार आहे. पावसाळी अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षांकडून तयारी सुरु झाली असून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मविआ रणनिती आखणार आहे. अशातच, शिवसेनेप्रमाणे अधिवेशनात राष्ट्रवादीतही व्हिपचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व आमदारांना व्हीप बजावणार असल्याचे समजते आहे.
अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक होणार असून सुनिल तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहण्याबाबत नोटीस काढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यावरून अजित पवारांसोबत किती आमदार आहेत हे कळणार आहे.
तसेच, पावसाळी अधिवेशनासाठी अजित पवार गटाकडून आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. प्रतोद अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे शरद पवार गटाला हा व्हिप लागू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज विरोधी पक्षांना चहापानाला सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केले आहे. परंतु, विरोधकांकडून चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.