राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार? अजित पवारांनी दिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातो तर राष्ट्रवादी काँग्रसचे तब्बल 12 नेते फुटणार असल्याचे संकेत शिंदे गटाच्या नेत्यांनी दिले आहेत. यामध्ये सोलापूरच्या बड्या नेत्याचा समावेश आहे, असा धक्कादायक दावा शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यानंतर आता शिर्डीमध्ये सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संबंधित महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.
काय दिला अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला?
शहाजी बापू पाटील आणि शिंदे गटातील नेत्यांच्या दाव्यानंतर अजित पवार यांनी आपल्या पक्षातीन नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. “ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका”, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. शिवसेनाबाबत जे घडले, त्याने नाव गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही”, असे अजित पवार आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहे.