कृषीमंत्री Dhananjay Munde आज दिल्ली दौऱ्यावर; कारण काय?
कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे. याविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
निर्यात शुल्क लावल्याने विदेशात जाणाऱ्या कांद्याची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे 130 ते 140 कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे यावर काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू. वेळ पडल्यास शेतकऱ्यांचा हितासाठी दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार.