Nitesh Rane : ठाकरे यांच्यात मैदानात लढण्याची हिंमत नाही, म्हणूनच...
सतेज औंधकर | कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ( Mumbai Suburban District Collector) जुहू येथील अधिश बंगला सीआरझेड उल्लंघनाप्रकरणी त्यांना नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असे त्यांनी सांगितले आहे.
नितेश राणे म्हणाले की. आम्ही जुहूच्या घरात 12 वर्षांपासून राहतो. परंतु, आताच नोटीस आली आहे. सगळ्या काही अनियमितता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरच कशा, असा सवाल त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मैदानात लढण्याची हिंमत नाही. म्हणूनच नोटीस पाठविण्यात आली. असो लोकशाही आहे आम्ही कायदेशीर उत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेनंतर आता मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. जुहू येथील अधिश बंगला सीआरझेड उल्लंघनप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून नारायण राणेंना 10 जूनला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिश बंगल्याला 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझेड अंतर्गत एनओसी दिली होती. यातील 2 अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एफएसआय कमी असातनाही 2.12 एफएसआय वापरला गेला, तसंच बंगल्यासाठी 2810 चौरस मीटरची बांधकाम परवानगी असताना 4272 चौरस मीटरचं बांधकाम केल्याचं या नोटिसीत म्हटलं आहे.