संजय राऊतांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी
Chhagan Bhujbal : महाराष्ट्रातील उद्धव सरकार कोसळणे आता जवळपास निश्चित झाले आहे. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 42 आमदारांचा व्हिडिओ जारी केला. दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकीला फक्त 17 आमदार होते. शिवसेनेच्या (Shiv Sena) वेगळा गट स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला 37 आमदारांची गरज आहे. शिवसेनेच्या अंतर्गत बंडाचा थेट परिणाम पक्षाच्या खासदारांवरही होणार आहे. पण, सध्या महाराष्ट्रात अत्यंत नाट्यमय घटना होत असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शिवसेनेच्या खासदारांची ‘’झाकली मूठ सव्वालाखाची’’ असेल. (After Sanjay Raut's statement, there is huge resentment in NCP Chhagan Bhujbal)
शिवसेनेचे लोकसभेत राज्यातून १८ तर, राज्यसभेत तीन खासदार आहेत. मुंबईबाहेरील शिवसेनेचे खासदार आतातरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असले तरी, अनेक खासदारांनी पक्षातील घडामोडींवर न बोलणे पसंत केले आहे. ‘’नजिकच्या भविष्यात काय होईल त्यावर आमचेही भविष्य ठरेल’’, असे सांगत खासदारांनी ‘’वेट अँड वॉच’’चे धोरण अवलंबलेले आहे.
तर दुसरीकडे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, संजय राऊत यांनी असं विधान करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील आमच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी हे सर्व विश्वासात घेऊन बोलायला हवं होतं, त्यांच्या काय अडचणी आहेत ते सांगायला हवं होतं.
शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
अर्थात शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, मात्र आमदारांनी 24 तासांच्या आज मुंबईत यावं असं आवाहन त्यांनी केलंय. संजय राऊतांच्या नेमक्या याच भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेनं हे वक्तव्य करण्यापूर्वी एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.