बऱ्याच काळानंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी
राज्यात एकीकडे अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी येत्या निवडणुकांसाठी आपली राज्यभर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच मनसे सुद्धा चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे हे तब्बल पाच वर्षानंतर कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या दौऱ्यासंबंधी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
असा असेल राज ठाकरेंचा कोल्हापूर दौरा
मंगळवारी दुपारी 4 वाजता ते आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊस येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ते मनसे समर्थकांशी संवाद साधतील आणि शासकीय सर्किट हाऊसमध्ये येणार्या सर्वांना भेटतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील. कोकण दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे हे कोकणसाठी रवाना होतील.