दानवेंनंतर खडसेंचे मध्यवधी निवडणुकीवर मोठे विधान; म्हणाले, सरकार खोक्यांमुळे...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच शिंदे- फडणवीस सरकार पडेल असे भाकीत विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या दाव्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे सांगितले जात आहे. पण दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारबद्दल खळबळजनक विधान केले आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा त्याच विषयावरून भाष्य केले आहे.
काय म्हणाले खडसे?
“राज्यात काहीही होऊ शकतं. आतापर्यंत राज्यातील राजकारण पाहिलं तर सरकार बदलले, काही सरकार खोक्यांमुळे बदललं तर काही असंच बदललं, असे चित्र अनुभवात येतंय. त्यामुळे नेमकं काय होईल, याचा अंदाज आता घेणं अवघड आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“एकवेळ मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यावेळेस फार मोजक्याच लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, इतरांना मिळणार नाही. अशावेळेसे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदारांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आमदारांमध्ये अस्वस्थता बाहेर येण्याची शक्यता आहे”, असा दावा खडसेंनी केला.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
“सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. भाजप सेनेची युती तुटली, गेल्या २.५ वर्षांत चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं कुणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली की एक रात्रीत सरकार गेलं. आता, असंच राजकारण चाललं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणार, याचा कोणी अंदाज लावला का? असे केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.