अजित पवारांनंतर रोहित पवार रडारवर; मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट केले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्याने कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवांराकडे असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता यानंतर मोहित कंबोज यांनी आणखी एक सूचक ट्विट करत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले आहे.
सिंचन घोटाळ्याचा पुन्हा एकदा तपास व्हावा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मोहित कंबोज यांनीच सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.
यानंतर मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन रोहित पवारांना आता एकप्रकारे इशारा दिला आहे. बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी सुरू आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीचा अभ्यास करत आहे. लवकरच या यशोगाथेमागचा सविस्तर अभ्यास शेअर करेन, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. हे ट्विट त्यांनी रोहित पवारांना टॅग केले आहे. यामुळे आता राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, २२ जून १९७१ रोजी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेची स्थापना झाली. बारामती पॅटर्न म्हणून जगभर गौरवली गेली आहे. बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार आहेत.